मेरठ - युपीतील मेरठच्या हस्तीनापूरचे माजी पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि कमाईपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकारी धर्मेंद्र कुमार यांनी 9 वर्षात 62 लाख रुपये कमावले. मात्र, खर्च दीड कोटी रुपये केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कुमार यांनी मेरठ येथे फ्लॅट घेण्यासह अनेक ठिकाणी संपत्ती जमवली आहे. त्यामुळेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मेंद्र कुमार हे हस्तीनापूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी अलिशान फार्म हाऊस बनवले होते. घनदाट जंगलात सर्व सुविधांनीयुक्त हे फार्म हाऊस आहे. धर्मेंद्र यांच्या शास्त्रीनगर येथील घरात वीजचोरीचाही प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळीही त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर, धर्मेंद्र यांचे अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. याप्रकरणी एसीबीकडून झालेल्या तपासणीत धर्मेंद्र कुमार यांच्यावर बहुतांश आरोप सिद्ध झाले. कमाईपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचे सबळ पुरावे मिळाल्याने धर्मेंद्र यांच्याविरुद्ध अखेर मेडिकल पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक शर्मा यांनी सांगितले की, धर्मेंद्र हे मूळ आग्र्याच्या सिकंदराबाद पोलीस ठाणे परिक्षेत्रातील भोपालकुंजचे रहिवाशी आहेत. सन 2011 मध्ये वडिलांच्या मृत्युनंतर आश्रित येथे धर्मेंद्र यांना नोकरी मिळाली होती. दरम्यान, आता त्यांच्याविरुद्ध मेडिकल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तपास एसीबीकडूनच केला जाणार असल्याचे एसीबीचे डीआयजी राजीव मल्होत्रा यांनी म्हटले.