जळगाव : ठेवीदारांच्या पावत्या कमी किमतीत विकत घेऊन त्या कर्जात समायोजित केल्याच्या प्रकरणात सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत गणपत भंगाळे, दालमील असोसिएशनचे प्रेम रामनारायण कोगटा, जयश्री शैलेश मणियार यांच्यासह ११ जणांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आजी, माजी लोकप्रतिनिधी यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अटकेतील या सर्व जणांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अटकेतील संशयितांनी एजंटच्या माध्यमातून पतसंस्था बुडाल्याचे वातावरण तयार करुन ठेवीदारांच्या २० ते ३० टक्क्यात पावत्या खरेदी करुन पूर्ण रक्कम मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. या साखळीत एजंट, कर्जदार, प्रशासक यांच्यासह आणखी काही इतरांचा समावेश असल्याचे उघड झालेले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेल्यांचा आकडा सतरावर पोहचला आहे.
प्रमोद कापसेची चौकशी सुरुच
दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी ,भुसावळ, औरंगाबाद, मुंबई, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र राबविले. यात १२ जणांना ताब्यात घेतले. एकूण ११ जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. १२ वी व्यक्ती प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) यांना अद्याप अटक झालेली नाही.