Allahabad University: प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठात (Allahabad University) सोमवारी मोठा गोंधळ झाला. विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या जोरदार दगडफेकी डझनभर विद्यार्थी जखमी झाले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या गोंधळात माजी विद्यार्थी विवेकानंद पाठक यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित आहेत.
विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते, यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली. विटा, दगड फेकण्यापर्यंत वाद वाढला अन् संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये तोडफोड करण्यासोबतच काही वाहने पेटवून दिली आहेत. यावेळी माजी विद्यार्थी विवेकानंद पाठक याच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्याचा आरोप करत विद्यापीठ परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या.
या गोंधळाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून विटा आणि दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आताही काही विद्यार्थी विद्यापीठ परिसरात तोडफोड करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी संघटना पुनर्स्थापित करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थी संघटनेच्या इमारतीचे बंद कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, यामुळेच हा सर्व वाद सुरू झाला.