नागपूर - सासऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप करून सासू आणि अन्य मंडळी आपला छळ करीत असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली. विशेष म्हणजे, अनेक दिवस माहेरी राहिल्यानंतर अचानक सासरी परतलेल्या या विवाहितेने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न करून आत्महत्येची धमकी दिल्याने हादरलेल्या पोलिसांनी शुक्रवारी अखेर गुन्हा दाखल केला.
मूळची अमरावती येथील रहिवासी असलेल्या अनामिका (नाव काल्पनिक) हिचा कर्नाटक, विजापूर येथे बँक व्यवस्थापक असलेल्या तरुणाशी काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी अनामिकाच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सासू आणि इतरांनी दोष देत आपला छळ सुरू केल्याचे अनामिका सांगते. कुटुंबकलह वाढल्याने ती माहेरी निघून गेली. अचानक गेल्या आठवड्यात परत आली आणि पुन्हा सासू-सुनेचा वाद उफाळून आला. गुरुवारपासून तो तीव्र झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रारी झाल्या. घरगुती वाद म्हणून पोलिसांनी समंजसपणाचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या अनामिकाने स्वताला घरात कोंडून हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने पोलीस हादरले. त्यामुळे सुनेचा छळ करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रकरणाची पोलिसांकडून स्पष्टपणे माहिती दिली जात नसल्याने हुडकेश्वरमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.