लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन-वाहतूक साठी दोन ठेकेदारांना दिलेल्या ठेक्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष व मीरा भाईंदर १४५ विधानसभा निवडणूक प्रमुख ऍड. रवी व्यास यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडे या बाबत लेखी तक्रार त्यांनी केली आहे.
महापालिकेत ऍड . रवी व्यास यांनी कचरा ठेक्यात घोटाळा झाल्याचे सांगितले . यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती सुरेश खंडेलवाल व पंकज पांडेय, गजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते . व्यास म्हणाले कि, भाईंदर महापालिकेने साफसफाई व कचरा वाहतुकी साठी प्रभाग समिती १ , २ व ३ चा १ झोन करून त्याचे कंत्राट ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला जुलै २०२३ मध्ये दिले आहे . तर त्या आधी प्रभाग समिती ४, ५ व ६ मिळून झोन २ साठी मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना मार्च २०२३ मध्ये ठेका दिला आहे . सदर ठेका ५ वर्षां साठी आहे.
२०१२ मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ला साफसफाईचे कंत्राट देताना पहिल्या वर्षी ३९ कोटी व नंतर दरवर्षी वाढत जाऊन २०२३ मध्ये ९० कोटी पर्यंत पोहचले होते. ठेकेदाराची वाहने , कामगार आदी धरून देखील २०२३ मध्ये ९० कोटी वर्षाला खर्च केला असताना नव्याने कंत्राट देताना तब्बल १५० कोटी रुपये पहिल्या वर्षात खर्च केले जाणार आहेत . शिवाय दरवर्षी त्यात वाढ केली जाणार आहे. ठेक्यात सफाई कामगारांना किमान वेतन नुसार प्रतिदिन १ हजार ३३ रुपये देय असताना प्रतिदिन १ हजार ३९९ रुपये निश्चित करून पैसे ठेकेदारास दिले जात आहेत . रोज सुमारे १८०० सफाई कामगार काम करत असल्याचे विचारात घेता रोज प्रति कामगारच्या नावाखाली ३६६ रुपये जास्त देऊन ५ वर्षां करता तब्बल १२० कोटी २३ लाख रुपये ठेकेदारांना जास्त मिळणार आहेत. बोनस व ग्रॅच्युटी सुद्धा मासिक देयकात दिली जात आहे.
आधीच्या ठेक्यात कचरा वाहक वाहने हि ठेकेदाराची होती व ३ टन क्षमतेच्या वाहना साठी रोज ७ हजार ८२६ रुपये पालिका देत होती . परंतु आता तर कचरा वाहक वाहने हि पालिकेची असून देखील ठेकेदारास प्रति वाहन दररोज १३ हजार २०० रुपये पालिका देत आहे . पालिकेचे वाहन आणि पैसे देखील जास्त असा हा गैरप्रकार असून प्रतिदिन ५ हजार ३७४ रुपयांचा फरक पाहता ५ वर्षात ठेकेदारास १८० कोटी ४४ लाख रुपये जास्त दिले जाणार आहेत . कचरा गाड्यांवर लागणारे कामगार हे प्रति वाहनाच्या खर्चात समाविष्ट असताना वाहनांवर कामगार मात्र १८०० कामगारां मधीलच घेतले जात आहेत असा आरोप यावेळी व्यास यांनी केला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमत करून हे दोनच ठेकेदार पात्र ठरतील त्यानुसार निविदेच्या अटीशर्ती तयार केल्या . झोन २ मध्ये ग्लोबल ने निविदा भरली असताना त्यांनी ती मागे घेतली व कोणार्कचा मार्ग मोकळा केला . निविदा मागे घेतल्याने ग्लोबलची अनामत रक्कम जप्त करून त्याला काळया यादीत टाकणे आवश्यक असताना पालिकेने तसे केले नाही . दोन्ही ठेकेदारांना प्रचंड आर्थिक फायदा करून घेण्यासाठी पालिकेने संगनमताने हे कारस्थान करून महापालिका आणि शहरातील करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान चालवले आहे . आवश्यक तांत्रिक मंजुरी ठेका देताना घेतली नाही . सुमारे ५०० कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप करत दोन्ही ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे यावेळी ऍड. रवी व्यास यांनी सांगितले.