उल्हासनगर : पोलिस ठाण्यातील गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे गायकवाड यांच्यासह चौघांची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
कट रचून गोळीबाराचा आराेप हास्यास्पदआ. गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला, हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. आमदारांचा मुलगा वैभव यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार घेण्यास पोलिसांनी उशीर केला. त्यामुळे हे प्रकरण घडल्याचे आ. गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.
पाेलिसांचा बंदाेबस्तन्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवूनही आ. गायकवाड समर्थक न्यायालय परिसरात हजर होते. आ. गायकवाड यांचे वकील ॲड. उमर काझी यांनी जोरदार प्रतिवाद केल्याने न्यायालयाने आ. गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
उल्हासनगर हिललाइन पोलिस ठाण्यात आ. गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी आ. गायकवाड त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर, नागेश बेडेकर, रणजित यादव व विक्की गणोत्रा यांच्यासह इतरांवर हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यापैकी वैभव गायकवाड, नागेश बेडेकर अद्याप फरार असून, इतर सहा जणांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. आ. गायकवाड, सरवणकर, यादव, केणे यांची १४ फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी सकाळी ९ वाजता उल्हासनगर न्यायालयात आणण्यात आले.