बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात हुंड्याप्रकरणी छळ केल्याप्रकरणी सुनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओडिशाचे कटक लोकसभा खासदार भर्तृहरि महताब , त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी खासदार महताब यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधात, भादंवि कलम ४९८, ५०६ आणि ३४ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम ३/४ अंतर्गत असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळच्या महादेव परिसरात राहणारी तक्रारादर सून साक्षी यांचे लग्न ओडिशाच्या बीजू जनता दलाच्या खासदाराचा मुलगा लोकरंजन यांच्यासोबत २०१६ ला दिल्लीत झालं होतं.
स्थानिक पोलीस अधिकारी अजिता नायर यांनी सांगितले की, महताब यांची ३४ वर्षीय सून साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस ठाण्यात पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हुंडासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप खर्च केला होता. आता माझ्यावर हुंड्यासाठी सासरचे लोकं छळ करत असल्याचे साक्षी यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच साक्षी यांनी आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबाने २०१६ मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून दीड कोटी दिले. मात्र, ते अधिकाधिक पैशांची मागणी करत होते.