मुंबई : आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, अशी तोंडी विनंती शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाला केली. विशेष न्यायालयाने विधीला इंद्राणीबरोबर राहण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयाला वरील विनंती केली.
न्यायालयाने फेटाळलेल्या अर्जात विधीने म्हटले होते की, आईला २०१५ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. गेली सात वर्षे आईच्या प्रेमापासून, सहवास आणि जिव्हाळ्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात इंद्राणीची जामिनावर सुटका करताना तिला कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क न साधण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली होती, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने आईबरोबर राहण्यास परवानगी मागणारा विधीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. २०१५ मध्ये सीबीआयने विधीचा जबाब नोंदविला आहे.
‘विधी भारतात आली आहे, ती तिच्या आईला भेटली नाही. ती आईला किमान मिठी तरी मारू शकते का?’ अशी विचारणा विधीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर म्हणाले की, इंद्राणीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने अटी ठेवल्या होत्या.