लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंब्रा आणि परिसरातील ४०० तरुणांचे कथित ऑनलाइन धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या बद्दो ऊर्फ शाहनवाज खान (२३) याला ठाणे ते गाझियाबाद नेण्यासाठीची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी दिली. अलिबागमधून ताब्यात घेतल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली होती.
पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, निरीक्षक माधुरी जाधव, बाबासाहेब निकम आणि सहायक पोलिस निरीक्षक अजय कुंभार, तसेच गाझियाबादच्या कवीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास अग्निहोत्री आणि सहदेव सिंग आदींच्या पथकाने त्याला ११ जूनला अलिबागमधील एका फार्म हाउसमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची मुंब्रा येथे वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. त्याच्यावरील ऑनलाइन धर्मांतराच्या आरोपाची पडताळणी, त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे किंवा कसे ? अशा अनेक बाबींचा तपास करायचा असल्याची माहिती ठाणे आणि गाझियाबाद पोलिसांनी सोमवारी ठाणे न्यायालयात दिली. त्यासाठी ठाणे ते गाझियाबादला नेण्यासाठी त्याच्या ट्रान्झिट कोठडीची मागणी करण्यात आली हाेती.
योग्य सुरक्षा देण्याचेही निर्देश
- न्यायालयाने ही मागणी मान्य करतानाच त्याला योग्य ती सुरक्षा पुरविण्याचेही आदेश पोलिसांना दिले.
- त्यानुसार महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत ठाणे पोलिसांनी प्रवासादरम्यान त्याला सुरक्षा पुरविली होती.
- त्याच्या गाझियाबाद येथील घरातून पोलिसांनी काही इलेक्ट्रिक उपकरणेही हस्तगत केली असून त्याच्याकडे आता गाझियाबादचे पोलिस पथक कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.