मुंबई : मूकबधिर अर्शदअली सादीकअली शेख याच्या हत्या प्रकरणामागचे आणखी कंगोरे उलगडण्यासाठी पोलिसांनी दुभाषाच्या मदतीने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मूकबधिर जय चावडा, शिवजित सिंग आणि रुक्साना शेख यांची एकत्रित चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पायधुनी पोलिसांनी अटक केलेल्या रुक्सानाला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रुक्साना आणि जय यांच्यात २०२२ पासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. अर्शदचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी जय त्याची हत्या करणार आहे, याची पूर्ण कल्पना रुक्सानाला होती.
हत्या, हत्येआधी केलेली अमानुष मारहाण जयने रुक्सानालाही व्हिडीओ कॉलद्वारे दाखवली होती. अर्शदचा मृतदेह पाहिल्यानंतर रुक्सानाला दुःख वगैरे काहीच झाले नाही. तिने हत्या झाल्याचे लपवून ठेवले.
बेल्जियमच्या सीमचे रहस्य काय?- या हत्येत आरोपी रुक्साना, जय आणि शिवजित सिंग यांच्यात आर्थिक व्यवहारही झाल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. पोलिस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत.- मोबाइलमधील पुराव्यांसह गुन्ह्यात अन्य कोणी सामील आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. - बेल्जियमधील सीम कार्डच्या आधारे अर्शदच्या हत्येचा व्हिडीओ मूकबधिरांच्या ग्रुपला दाखवणारा मुख्य आरोपी जयचा मित्र आहे. याबाबत आरोपींची चौकशी सुरू आहे.