वॉशिंग्टन : अमेरिकेत महागड्या कुत्र्यांची चोरी झाल्याच्या घटनेने पोलिसही हैराण झाले आहेत. फ्लोरिडामध्ये चोरट्यांनी घराच्या खिडक्या फोडून 19 फ्रेंच बुलडॉग चोरल्याची घटना घडली आहे. पोर्ट सेंट लुसी पोलीस विभागाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, या बुलडॉग जातीच्या कुत्र्यांची किंमत 100,000 डॉलरपेक्षा जास्त आहे. पोलीस सध्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घराचा मालक बाहेर गेला असताना ही चोरी झाल्याचे पोलिसांनी फेसबुक आणि ट्विटरवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. बुलडॉग चोरी झालेल्या घराचे फोटो पोलिसांनी शेअर केले आहेत, यामध्ये घराच्या तुटलेल्या खिडक्या दिसत आहेत. तसेच, संशयित वाहनातून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हे नुकतेच घडले - घरफोडी दरम्यान 19 बुलडॉग चोरीला गेले. आज सकाळी 11:21 वाजता, पीएसएलपीडीला निवासी चोरीसंदर्भात माहिती मिळाली. जेव्हा रहिवासी घरी नव्हते. संशयितांनी बेडरूमची खिडकी फोडून 19 फ्रेंच बुलडॉग चोरले. ज्यांची किंमत 100,000 डॉलर पेक्षा जास्त आहे. समोरील बंपर खराब झालेल्या वाहनात संशयित निघून गेले. कृपया या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी पीएसएलपीडीशी संपर्क साधा."
न्यूयॉर्क पोस्टच्या मते, अलीकडच्या काही वर्षांत फ्रेंच बुलडॉग चोरीला जात असल्याच्या बातम्या वाढत आहेत. अनेकांना वाटते की ते महागडे असणे हे चोरीचे कारण असू शकते. फ्रेंच बुलडॉग ही अमेरिकेतील दुसरी सर्वात लोकप्रिय कुत्र्याची जात आहे आणि त्यांची किंमत 1,500 आणि 4,500 डॉलर दरम्यान आहे.