विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसून हैदोस घालणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या माथेफिरू प्रवाशाला पोलिसांनीअटक केली आहे. मंगळवारी रात्री प्रवासी विमान विमानतळावर थांबलं असताना अचानक हा प्रवासी कॉकपिटमध्ये घुसला आणि मोडतोड करू लागला. अमेरिकन एअरलाइन्सने या प्रवाशाला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.
फ्लाइट 488 मियामीच्या बोर्डिंग दरम्यान, प्रवाशाने "ओपन फ्लाइट डेकमध्ये प्रवेश केला आणि विमानाचे नुकसान केले. अमेरिकन एअरलाईनच्या विमानात हा प्रकार घडला. माथेफिरूच्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आणि इतरांनी काहीही हालचाल करण्याअगोदरच माथेफिरूनं कॉकपिटमध्ये प्रवेश केला होता. अमेरिकन एअरलाईन्सचं विमान होंड्युरसवरून मियामीला जाणार होतं. त्यासाठी ते होंड्युरस विमानतळावर उभं होतं आणि प्रवाशांना आतमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी नेहमीच्याच मार्गाने प्रवासी म्हणून आतमध्ये आलेला एक प्रवासी स्वतःच्या सीटकडे न जाता कॉकपिटच्या दिशेने गेला. तिथल्या वेगवेगळ्या कंट्रोलची मोडतोड करायला त्याने सुरुवात केली.
कॉकपिटमध्ये असलेल्या वैमानिकाने माथेफिरूला पाहून प्रश्न विचारला आणि त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचं काहीही म्हणणं ऐकून न घेता त्याने थेट वस्तूंची मोडतोड करायला सुरुवात केली. माथेफिरू प्रवाशाची हे कृत्य पाहून केबिन क्रूने त्याला पकडलं. त्यावेळी त्याने वैमानिकाच्या शेजारी असणाऱ्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.