उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाने गुंडगिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कायद्याला न घाबरता सपा नेत्याच्या मुलाने पोलिसांच्या उपस्थितीत सीओ कार्यालयासमोर एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली आहे.
सपा नेत्याने मौल्यवान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप वृद्ध व्यक्तीने केला आहे. त्यांनी आपल्या मुलासह याप्रकरणी तक्रार केली होती. त्यामुळे सपा नेत्याच्या मुलाने वृद्धासह त्याच्या मुलाला सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केली.
गंगौली गावातील रहिवासी आणि सपा नेते शिव प्रताप यादव यांचा मुलगा प्रदीप यादव याची गुंडगिरी पाहायला मिळाली. त्याने व त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोरच वृद्धाचा आणि त्याच्या मुलाचा पाठलाग केला आणि त्याला मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर लोकही उपस्थित होते. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रामयश यादव यांनी आरोप केला आहे की, शिव प्रताप यादव यांनी त्यांच्या गावातील आरक्षित जमिनीवर अतिक्रमण केलं आहे, त्याबाबत आम्ही तक्रार केली आहे. यामुळे सपा नेते शिव प्रताप यादव खूप संतापले. आज खुनास येथील परिसरात त्यांच्या मुलाने आमच्यावर हल्ला केला. मला आणि मुलालाही लाथा-बुक्क्यांनी मारलं, बेदम मारहाण केल्याचं सांगितलं.