Mumbai Drugs Case: मुंबईतील समुद्रात एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टी अमली पदार्थ नियंत्रक कक्षानं (NCB) उधळून लावल्यानंतर मोठा गदारोळ उडाला आहे. याप्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी काही उद्योगपतींच्या मुली आणि उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश आहे. संबंधित ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याप्रकरणी कॉर्डिलिया क्रूज कंपनीचं नाव पुढे आलं आहे. आता कॉर्डिलिया कंपनीकडून याप्रकरणात एक स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या कथित रेव्ह पार्टीशी कॉर्डिलिया कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचं कंपनीच्या सीईओंनी म्हटलं आहे.
दिल्लीस्थित एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला खासगी कार्यक्रमासाठी क्रूझ देण्यात आली होती. कंपनीनं हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता, असं स्पष्टीकरण कॉर्डिलिया क्रूझ कंपनीकडून देण्यात आलं आहे. याशिवाय संबंधित प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
"मुंबईतील कथित ड्रग्ज पार्टीशी कॉर्डिलिया कंपनीचा दुरान्वये संबंध नाही. या प्रकरणाशी कंपनीचा प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नाही. आमच्यासोबत गेली अनेक वर्ष जोडल्या गेलेल्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी कंपनी आजवर कटिबद्ध राहिली आहे. संबंधित घटना आमच्या कंपनीच्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधी आहे. अशापद्धतीच्या कार्यक्रमांचा किंवा घटनांचा आमची कंपनी पूर्णपणे विरोध करते. तसंच यापुढील काळात अशा कार्यक्रमांसाठी क्रूझ उपलब्ध करुन दिली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. असं असलं तरी संबंधित प्रकरणासाठी तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे", असं कॉर्डिलिया क्रूझ कंपनीचे सीईओ जुर्गेन बेलोम यांनी म्हटलं आहे.
आर्यन खानला अटकदरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला चौकशीनंतर अखेर एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. आर्यनसोबत आणखी दोन जणांना अटक केली गेली आहे. तिघांनाही मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीच चाचणीसाठी सध्या नेलं असून त्यानंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे.