मुंबई : ''निकला भाऊ से टक्कर लेने.. ताऊ.. मामुली आदमी नही है.. असा स्टेट्स ठेवून भांडूपमध्ये करण्यात आलेल्या सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याच्या हत्येप्रकरणी अखेर गुन्हे शाखेने पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार अमित भोगले याला गजाआड केले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने भांडूपमध्ये ही धडक कारवाई केली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सूरज नेपाळी याने कारागृहातून बाहेर पडताच आपले चायनीज सेंटर सुरू केले होते. गुन्ह्यातील तारखेला न्यायालयात गेला असताना भांडूप पोलिसांच्या अभिलेखवरील गुन्हेगार अमित भोगले याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी सूरजने त्याला थेट एकट्याने समोरासमोर भिडण्याची धमकी दिल्याचे समजते. याच रागातून भोगले याने सूरजची हत्या घडवून आणल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
''निकला भाऊ से टक्कर लेने.. ताऊ मामुली आदमी नही है.. उद्या रात्री दोन वाजता.. समझदारला इशारा काफी.. सीधा चीर... ..भाईला पण ऐकू द्या गुड न्यूज आत (जेलमध्ये)'' हे दोन स्टेटस भांडूप हत्याकांडातील आरोपींनी हत्याकांडाच्या आधी आपल्या सोशल मीडियावरील खात्यावर अपलोड केले होते. यामध्ये चाकू, सुऱ्याचे फोटोही ठेवले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी सूरज नेपाळी याची हत्या केली.
भांडूप पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर आरोपी राहुल जाधव, उमेश कदम यांच्यासह एकूण ८ आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या नेतृत्वातील पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. गुन्ह्यामध्ये भोगलेचा सहभाग स्पष्ट होताच गुन्हे शाखेने भोगलेला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांनी भोगलेच्या अटकेला दुजोरा देत तो सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत असल्याचे सांगितले. तसेच या गुन्ह्यात यापूर्वी अटक झालेल्या आरोपीकडे हत्येचा उद्देश नव्हता. मात्र, भोगलेकडे हत्येचा उद्देश होता. त्यातूनच ही अटकेची कारवाई करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याच्याकडे काही हत्यारदेखील सापडल्याची माहिती मिळते आहे.
अभिलेखावरील आरोपी...
अमित भोगले हा अभिलेखावरील आरोपी असून यापूर्वी हत्येसह गोळीबारच्या गुह्यांत त्याला अटक करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्याने तयारीही सुरू केली होती. मात्र, त्यातच अटकेची कारवाई झाल्याने भांडूपमधील गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.