लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा दोषसिद्ध गुन्हेगार अमित गजानन गांधी याला शिक्षा माफी पकडून २८ वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांनी शुक्रवारी हा निर्वाळा दिला.गांधीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याच्या वडिलाने १२ एप्रिल २०१६ रोजी राज्य सरकारला अर्ज सादर करून त्याला कायमचे सोडण्याची मागणी केली होती. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारने त्या अर्जावर निर्णय घेऊन गांधीला ३० वर्षे कारावासाच्या गटात टाकले होते. त्यावर त्याचा आक्षेप होता. हा निर्णय अवैध ठरवून २२ वर्षे कारावासाच्या गटात टाकण्याची विनंती त्याने केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्याची याचिका अंशत: मंजूर करून त्याला २८ वर्षे कारावासाच्या गटात टाकण्याचा आदेश दिला.२१ वर्षावर काळापासून कारागृहात असलेल्या गांधीने कायद्यातील तरतुदी, चांगले वर्तन, शिक्षणातील प्रगती इत्यादी मुद्यांच्या आधारावर दिलासा मिळण्याची विनंती केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४३२ मध्ये बंदिवानांची शिक्षा स्थगित किंवा माफ करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला १४ वर्षे कारावास भोगल्यानंतर सोडण्याचा आदेश दिला होता. आतापर्यंत कारागृहात चांगले वर्तन ठेवले असून त्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. कारागृहात राहून बी.ए. व एम. ए. (समाजशास्त्र) पदवी मिळविली. मनाचे विचार व्यक्त करणे, वादविवाद यासह विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पुरस्कार प्राप्त केले, असे त्याने न्यायालयाला सांगितले होते. गांधीतर्फे अॅड. नितेश समुंद्रे तर, सरकारतर्फे अॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरणजुलै-१९९८ मध्ये गांधीने अल्पवयीन मुलीला कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरामागील निर्जन भागात नेले होते. त्या ठिकाणी त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून गांधीला अटक केली होती. ३० ऑक्टोबर २००२ रोजी सत्र न्यायालयाने गांधीला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गांधीचे कमी वय लक्षात घेता फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली.
अमित गांधी भोगेल २८ वर्षाचा कारावास : हायकोर्टाचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:04 PM
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा दोषसिद्ध गुन्हेगार अमित गजानन गांधी याला शिक्षा माफी पकडून २८ वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे.
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून करणारा गुन्हेगार