उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये अल दुआ मटन फॅक्टरीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी गॅस लीक झाल्याने १०० हून अधिक कर्मचारी बेशुद्ध पडले. धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये लहान मुलेही होती. यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या सर्वांना जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रोरावर पोलीस ठाणे भागातील मथुरा बायपासजवळ ही फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. यामुळे अचानक तिथे काम करणारे कामगार बेशुद्ध पडले. हे कामगार १०० हून अधिक संख्येने बेशुद्ध पडल्याने मोठी खळबळ उडाली. यापैकी ४५ जणांना जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. अन्य रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या कामगारांमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुले देखील आहेत.
यापैकी अनेकजण गंभीर आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. फॅक्टरी मालकाने बराच वेळ ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी फॅक्टरीमध्ये दाखल झाले.
जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह यांनी सांगितले की, डॉक्टरांना उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमागचे कारण काय, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.