Punjab Police E Rickshaw: वाहनाचे कादपत्र नसताना वाहन चालवणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे गुन्हा आहे. पण, अनेकजण दारू पिऊन वाहन चालवतात. यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. अशीच एक घटना पंजाबमध्ये घडली आहे. दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अडवले, पण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा पाठलाग करताना दिसत आहेत.
हा पाठलाग एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे थरारक आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालक रस्त्याने जाणाऱ्या अनेकांचा जीव धोक्यात घालतो. काहींना तर तो धडक देऊन पळून जातो. अखेर तो लहान-लहान गल्ल्यांमधून रिक्षा पळवतो आणि शेवटी चालू रिक्षा रस्त्यावर सोडून धावत पळून जातो. पोलिसही त्याचा शेवटपर्यंत पाठलाग करतात, पण तो काही त्यांच्या हाती लागत नाही. हे प्रकरण पंजाब राज्यातील अमृतसरमधील आहे. पोलिसांनी त्याची रिक्षा ताब्यात घेतली आहे.
व्हिडिओ पाहा...
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, आधी पोलिसाने त्याला थांबायला सांगितले पण तो थांबला नाही. यानंतर तो पळून जातो आणि पोलीस बाईकवरुन त्याचा पाठलाग करतात. या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा एक वृद्ध जोडपे रिक्षात बसले होते. त्यांना ग्रीन एव्हेन्यूला जायचे होते, पण त्याने दारुच्या नशेत त्यांना अमृतसरच्या लॉरेन्स रोडवर सोडले. याबाबत वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रिक्षाचालकाला पकडण्यास सुरुवात केली असता त्याने पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.