अहमदाबाद : दूध व्यवसायातील देशातील आघाडीच्या कंपनी 'अमूल'ची 4 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF or Amul) महाव्यवस्थापक अनिल बायती यांनी बुधवारी ही तक्रार दाखल केली आहे. ऑडिटदरम्यान ही फसवणूक (Fraud) उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. एमयू ट्रान्सपोर्ट कंपनीने मूळ बिलांच्या डुप्लिकेट प्रतींच्या आधारे अमूलकडून 4.02 कोटी रुपयांचे पेमेंट मिळवल्याचे आढळून आले.
मिति व्यास यांच्या नावावर एमयू ट्रान्सपोर्ट नोंदणीकृत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मित्ती ही उज्ज्वल व्यास यांची पत्नी आहे आणि उज्ज्वल हे अमूलच्या फ्रेश प्रोडक्ट डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. उज्ज्वल व्यास यांनी आपल्या पत्नीसह 2010 ते 2022 या 12 वर्षांत ही फसवणूक केली. अमूलच्या नियमांनुसार कंपनीचे कर्मचारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक कंपनीसोबत कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे उज्ज्वल व्यास यांनी कंपनीच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे.
पोलिसांकडून कारवाई सुरूआरोपी उज्ज्वल व्यास यांनी आपला गुन्हा कबूल केल्याचे म्हटले जात आहे. उज्ज्वल व्यास यांनी पत्नीच्या नावावर बनावट कंपनीची नोंदणी केल्याचे समजते. त्यानंतर 2010 ते 2022 या कालावधीत त्या बनावट कंपनीचे माध्यम बनवून पत्नीच्या खात्यात जवळपास साडेचार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, याप्रकरणी गुजरात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 471 (प्रत्यक्ष बिलांमध्ये छेडछाड) आणि 120 बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.