मंगेश कराळे
नालासोपारा:- धानिवबाग परिसरात राहणाऱ्या एका आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून अपघात झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पेल्हार पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या कटात सहभागी असणार्या एकुण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपाऱ्याच्या धानिवबाग येथील परशुराम चाळीत राहणारा रिजाय अली मुन्सी राजा (५५) हे अनुज, विनीत, जितेंद्र, टेलर व अन्य ओळखीच्या लोकांसोबत २१ ऑगस्टला कळंब समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. तर त्याच दिवशी रियाजची पत्नी मनसुरा खातून ही तिचा प्रियकर गौतम पंडित यांच्यासोबत जीवदानी येथे गेले होते. त्यानंतर रिजाय अली मुन्सी राजा याला अपघात झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे त्याचा मृत्यू झाला होता. परंतु नेमका अपघात कुठे आणि कसा झाला याची माहिती त्याची पत्नी मनसुरा (३५) देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
तपासामध्ये पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. मयत रियाजची पत्नी मन्सुरा ही नालासोपारा येथील गणेश पंडीत याच्या किराणा मालाच्या दुकानात काम करते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या २ ते ३ वर्षांपासून हे संबंध सुरू होते. या संबंधात तिचा पती रियाज अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याची योजना बनवली. त्यानुसार त्याला फिरण्याच्या बहाण्याने नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनार्यावर नेऊन त्याची हत्या केली. मृत रियाजची बहिण नुरजहा खान हिने गुरुवारी तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद होती. मात्र हत्येचे नियोजन पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने गुन्हा पेल्हारमध्ये वर्ग केला आहे.
सदर घटनेप्रकरणी प्रथम हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नेमकी आरोपी व संबधिताकडून तथ्यता पडताळणी केली जात आहे. ही हत्या नेमकी कशी व कोणत्या कारणांमुळे झाली याचाही तपास करत आहे. पेल्हार पोलिसांची टीम, तुळींज आणि गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने गुन्ह्याचा तपास करत आहे. - वसंत लब्दे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)