वाशिम : कारंजा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ नवनिर्माण सेनेच्या रुग्णवाहिकेमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून रुग्णवाहिका गाडीसह तीन जणांना अटक केली होती. पोलिस स्टेशन आवारात उभी केलेली रुग्णवाहिका शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याचे समोर आले आणि सीसीटिव्ही फुटेजवरून रुग्णवाहिका नेणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रुग्णवाहिका मनसे कार्यकर्ते अनुप ठाकरे यांची असल्याची माहिती समोर आली. जुगार प्रकरणात ताब्यात घेतलेली रुग्णवाहिका ही कारंजा पोलीस स्टेशनच्या आवारात लावली होती. रात्रीच्या आठ, नऊ वाजताच्या सुमारास ही रुग्णवाहिका चोरीला गेल्याची निदर्शनास आले.त्यानंतर पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने व तपास अधिकारी उपनिरीक्षक सुनील खंडारे यांनी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनुप ठाकरे व त्याचा सोबती गणेश मातोडे यांनी ही गाडी कारंजा पोलीस स्टेशन मधून चोरून नेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर कारंजा पोलीस स्टेशनचे दोन पोलिस उपनिरीक्षक हे अनुप ठाकरे याच्या घरी गेले असता तेथे रुग्णवाहिका उभी असल्याचे आढळून आले. रुग्णवाहिका देण्यास व स्वतः येण्यास अनुप ठाकरे यांनी नकार दिला. तेव्हा मात्र पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी स्वतः जाऊन अनुप ठाकरे व त्याची रुग्णवाहिका गाडी ताब्यात घेतली तसेच अनुप ठाकरे याच्यावर भादंवि कलम ३७९, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केला.