मुंबई : कामानिमित्त भारतात आलेल्या अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीत अश्लील चाळे करण्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी अंधेरी (पश्चिम) येथील जे. पी. रोडवर घडली. तक्रारदार महिला शेजारच्या जिल्ह्यात काही काम आटोपून मुंबईतील राहत्या घरी जात होती. त्यासाठी तिने खासगी इनोव्हा कार बुक केली होती आणि या कारमध्ये तिचे सहकारीही होते. पण, तिच्यासोबत असलेले सहकारी अंधेरी येण्याआधी उतरले.
अमेरिकन महिला चालकाच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिच्यासमोरच चालकाने हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. हे पाहून महिला घाबरली आणि जे. पी. रोडवर गाडी थांबवण्यास सांगितले. ही बाब रस्त्यावरील लोकांना कळताच त्यांनी चालकाला पकडले आणि पोलिसांना कल्पना दिली. तक्रारदार महिलेने डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.