पुणे : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्या नावे व्हाॅटस्ॲप मेसेज पाठवीत एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पाेलिसांनी संगणक अभियंत्यासह बँक कर्मचाऱ्यास अटक केली आहे. विविध राज्यांतून एकूण सात आराेपींना अटक केली आहे. एक काेटीची रक्कम आराेपींनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानुसार तेरा लाख रुपयांच्या रकमेसह चाळीस बँक खाती गाेठविण्यात आली आहेत. आणखी आराेपींचा शाेध घेत असल्याचे परिमंडळ दाेनच्या पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.
राजीवकुमार शिवजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैयाकुमार संभू महंतो (तिघे रा. बिहार), रवींद्रकुमार हुबनाथ पटेल (उत्तर प्रदेश), राबी कौशलप्रसाद गुप्ता (रा. मध्य प्रदेश), यासीर नाझीम खान (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. फायनान्स मॅनेजर सागर कित्तुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.
आदर पूनावाला यांच्या नावे सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे यांना ‘मी मिटिंगमध्ये व्यस्त आहे. मला फाेन करू नका. मी पाठविलेल्या आठ बँक खात्यावर तात्काळ रकमा पाठविणे,’ असा मेसेज पाठविण्यात आला हाेता. मेसेजमधील नमूद बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये पाठविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दि. ८ सप्टेंबर राेजी आदर पूनावाला यांनी ताे मेसेज पाठविला नसल्याचे सांगितल्यानंतर सिरम कंपनीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले हाेते.
पाेलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग -- आरोपींनी वापरलेल्या माेबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि टॉवर लोकेशन काढण्यात आले. - त्यामध्ये एका सीम कार्डवर १९ आयएमईआय क्रमांक मिळाले. - त्यातील एक क्रमांक आणि माेबाइल बिहार राज्यात वापरात असल्याचे दिसून आले. - त्यावरून बंडगार्डन पाेलिस पथकाने बिहार राज्यात चंद्रभूषण सिंह याला ताब्यात घेतले. त्यानंतर ६ आराेपींना अटक केली.