जळगाव : कुटुंबात किरकोळ वादाची ठिणगी पडली अन् संतापाच्या भरात महिलेने गळफास घेतल्याची घटना शनिवारी जिजाऊनगरात घडली. उपचार सुरू असताना रात्री या महिलेचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर रविवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आशा विशाल इंगळे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे.
आशा इंगळे या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात वास्तव्याला होत्या. पती विशाल मिळेल ते काम करायचे. शनिवारी सकाळी ९ वाजता घरात किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. आशा यांनी संतापाच्या भरात घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार देराणी मनिषा यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश सायकर, हवालदार अनिल फेगडे व विश्वनाथ गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेतली. मात्र, तेव्हा ती जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री ११ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आशा यांचे माहेर केळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील आहे. त्यांना तीन वर्षांचा ओम नावाचा मुलगा आहे. त्यांच्यापश्चात पती, सासू, सासरे, दीर, जाऊ असा परिवार आहे. रविवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.