डोंबिवली- केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे बनावट फेसबूक अकाऊंट उघडून, अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे. या खात्यावरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत असे जाहीर आवाहन त्यांनी बुधवारी केले आहे. आपल्याबाबतीत असा प्रकार झाला असल्यास, तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
कृपया सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मंत्री पाटील यांच्या समर्थकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे, पोलिसांनी याबाबत लक्ष घालून अशा घटना कोणाच्या बाबतीत घडू नये अशी मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यात अशा किती घटना झाल्या आहेत, त्या तक्रारींचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याचाही आढावा यानिमित्ताने घ्यावा आणि जर असे भावनिक आवाहन करून लोकांना लुटणारी टोळी असेल तर त्यावर निर्बंध घालण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला हवा असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.