लोकमत न्यूज नेटवर्क
केज: सख्ख्या भावाने कोयत्याने हल्ला केल्याच्या घटनेतून कशाबशा वाचलेल्या येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर शुक्रवारी दुपारी भावजयीने पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. काडी ओढण्यापूर्वीच त्या पळाल्याने बालंबाल बचावल्या.
शुक्रवारी दुपारी त्या तहसीलकडे जात होत्या. भावजय सुरेखा वाघ, तिचा भाऊ हरिदार महाले, तिची आई मुंजाबाई महाले, एक अनोखी महिला व वाहनचालक यांनी त्यांना अडविले. जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या व हक्कसोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली, त्यास नकार दिल्यानंतर दोरीचा फास टाकून त्यांचा गळा आवळला तर हरिदास महाले याने अंगावर पेट्रोल टाकले. वाघ यांनी हिसका देऊन फास बाजूला केला. लोक जमा होताच हल्लेखोर चारचाकी वाहनातून पळून गेले.
२०२२ मध्ये हल्ला
आशा वाघ या ६ जून २०२२ रोजी केज तहसील कार्यालयात काम करीत होत्या. यावेळी त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला होता.