नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून खून केला. वाकड येथे रविवारी (दि. २५) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. सलेमान राधेश्याम बर्डे (वय ८) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील राधेश्याम बर्डे (रा. वाकड) यांनी फिर्याद दिली. पवन जोगेश्वरप्रसाद पांडे (वय ३१, रा. उत्तमनगर बावधन, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम बर्डे हे बांधकाम मजूर आहेत. पत्नी आणि चार मुलांसह राधेश्याम वाकड येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि. २४) सायंकाळी त्यांचा मुलगा सलेमान हा घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही तो न सापडल्याने राधेश्याम यांनी वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सलेमान एका संशयित व्यक्ती सोबत पायी जात असताना दिसून आला. त्या आधारे पोलिसांनी संशयित पवन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सलेमान याचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह बावधन येथे टाकला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बावधन येथून सलेमानचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, पवन हा बावधन येथे राहत असून तीन दिवसांपूर्वीच राधेश्याम यांच्या घराजवळील एका रसवंती गृहात कामाला आला होता. त्यानंतर त्याने सलेमान याचे अपहरण करून खून केला. मात्र, अपहरण करून खून का केला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. तपासानंतर उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.