धुळे : पोलिसांना आलेल्या एका निनावी फोनवरुन साक्री तालुक्यातील हट्टी येथे सख्ख्या भावाने तरुण बहिणीला गळफास देऊन तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली. एकाशी प्रेमसंबंध असल्याने बहीण पळून जाण्याच्या बेतात असल्याच्या रागातून थेट टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली भावाने पोलिसांसमोर दिली. एका निनावी फोनवरुन पोलिसांनी ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आणला.
फोन आला अन् चौकशी सुरू
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि निजामपूरचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील या दोघांना घटनेच्या दुसऱ्या दिवशी १४ जून रोजी एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने हट्टी येथे पुष्पा रमेश हालोर (२२) या तरुणीने आत्महत्या केली नाही. तिचा खून झाला असल्याची माहिती दिली. त्यामाहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली.
नवलाणे येथील पुष्पा रमेश हालोर (२२) हीचे गावातीलच एकाशी प्रेमसंबंध होते. त्यातून ती पळून जाण्याच्या बेतात होती. ही बाब तिचा भाऊ संदीप रमेश हालोर (२४) याला कळाली. त्या रागातून त्याने १३ जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गावशिवारातील शिवमेंढा येथे तिच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करीत तिला गळफास लावून तिचा खून केला. तिने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यविधी आटोपला.
अकस्मात मृत्यूची नोंद
यासंदर्भात निजामपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर निनावी फोन आल्यावर घटनेने कलाटणी घेतली.संशयित भावाला अटक त्यानुसार, संशयित आरोपी संदीप रमेश हालोर याच्या विरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न-
तिचा अंत्यविधी करतेवेळी तिच्या अंगावरील कपडे, गळफास तयार केलेल्या साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकून पुरावे नष्ट केल्याचे त्याने तपासात पोलिसांना सांगितले. त्यानंतर निजामपूर पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात पोलीस नाईक संदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाढीव कलम लावून खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपीतास कोणी मदत केली आहे का, याचा शोधही आता पोलीस घेत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे करीत आहेत.
जीव जाईल तोपर्यंत थांबला-
जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले. एवढेच नाहीतर जीव जाईपर्यंत तो तिथेच थांबला. त्यानंतर घरी जाऊन पुष्पा हिने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवून आई, मित्र आणि नातेवाईकांना खोटी माहिती दिली.
अंत्यविधी झाला त्याठिकाणाहून मिळाले पुरावे-
पोलिसांनी ज्या ठिकाणी मुलीचा अंत्यविधी करण्यात आला त्या ठिकाणाची पाहणी केली. काही पुरावे गोळा केले. चौकशीसाठी काहींना ताब्यात घेतल्यानंतर भावाला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.