News about Amethi Murder: ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आले. अशीच घटना उत्तर प्रदेशात घडली असून, या घटनेतही आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. चार जणांच्या हत्येने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. चार जणांची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं. चौकशीसाठी आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते, त्यावेळी एन्काऊंटरची घटना घडली. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याजवळील रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीच्या पायावर पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली. यात आरोपी जखमी झाला आहे.
चंदन वर्माच्या पायावर झाडली गोळी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपी चंदन वर्मा याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. त्यावेळी चंदन वर्माने पोलीस अधिकाऱ्याकडील रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापट सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने चंदन वर्माच्या पायावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला.
मोहनगंज पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने चंदन वर्मा याला शुक्रवारी (4 ऑक्टोबर) नोएडा-जेवर टोलनाक्याजवळ अटक केली होती.
चंदन वर्माने पती-पत्नीसह कुटुंब संपवले
अमेठीतील शिवरतनगंज पोलीस ठाणे हद्दीतील अहोरवा भवानी चौकात भाड्याच्या घरात राहत असलेल्या शिक्षक सुनील कुमार (वय ३५), त्यांची पत्नी पूनम (वय ३२), सह वर्षाची मुलगी दृष्टी आणि एक वर्षाची दुसरी मुलगी सुनी या चौघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरूवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपी चंदन वर्मा याने स्वतःवरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता.
'पाच लोक मरणार आहेत'; व्हॉट्सॲपवर ठेवलं होतं स्टेटस
चंदन वर्मा याने चौघांची हत्या करण्यापूर्वी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं होतं. ज्यात त्याने लिहिलं होतं की, 'पाच लोक मरणार आहेत. मी लवकरच तुम्हाला दाखवेन'. चौघांची हत्या करून चंदन वर्मा स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करणार होता. त्यामुळे त्याने पाच लोकांचा उल्लेख केलेला होता.