डोंबिवली: डोंबिवली शहरासह कल्याण परिसरातील रस्त्याने जाणा-या नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरचे दागिने लांबविणा-या सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कल्याणमधील बाजारपेठ हद्दीतील सोनार गल्लीत सापळा लावून अटक केली. अफजल बन्ना खान ( वय ४६) रा. पिराणी पाडा, शांतीनगर भिवंडी असे अटक केलेल्या चोरटयाचे नाव आहे. तो रस्त्यावरून जाणा-या पादचारी नागरिकांना लक्ष करायचा. त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांचे दागिने लंपास करायचा.
एकजण नागरीकांची फसवणूक करून चोरी केलेले दागिने विकण्यासाठी बाजारपेठच्या हद्दीत येणार असल्याची माहीती गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार अनुप कामत आणि पोलिस शिपाई विनोद चन्ने यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या माहीतीवरून कामत आणि चन्ने यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, महिला पोलिस हवालदार मिनाक्षी खेडेकर, विश्वास माने, बालाजी शिंदे, दत्ताराम भोसले, किशोर पाटील, रमाकांत पाटील, पोलिस नाईक सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, विजेन्द्र नवसारे, रविंद्र लांडगे आदिंच्या पथकाने शनिवारी दुपारी चार वाजता बाजारपेठ हद्दीतील सोनार गल्लीत सापळा लावला.
सव्वापाचच्या सुमारास खान हा त्या परिसरात आला. माहीती देणा-या गुप्त बातमीदाराने खान आल्याच्या दिशेने इशारा करताच सापळा लावलेल्या पथकाने लागलीच खान ला पकडले. त्याची चौकशी केली असता तो घाबरून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टीच्या खिशात असलेल्या प्लास्टिकच्या पाउचमध्ये सोन्याचे एकुण २ लाख ६३ हजार ९३८ रूपयांचे ७ तोळे ५ ग्रॅम वजनाचे दागिने आढळुन आले. त्याला कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले गेले.
सहा गुन्हे उघडकीस
खान याच्या चौकशीत सहा फसवणुकीच्या गुन्हयांची उकल करण्यात आली आहे. यात कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या तीन, तर महात्मा फुले चौक, विष्णुनगर आणि रामनगर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्हयाचा समावेश आहे