- मंगेश कराळे
नालासोपारा : नागरिकांना फसवून त्यांना ब्लॅकमेंलिंग करुन खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. तिन्ही आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
वसईत राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाने त्याच्या मालकीचे घर भाडेतत्त्वावर एका महिलेला दिले होते. या महिलेने दोन आरोपीसोबत मिळून सन २०२२ मध्ये या बांधकाम व्यवसायिकाला रूममध्ये बोलावले. आरोपी मनिष शेठ व नफिस शेख यांनी बांधकाम व्यवसायिकाला महिला आरोपी प्रेग्नंट आहे, तु तिचेवर रेप केला अशी तक्रार पोलिसांत दाखल करेन अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी करुन व ठोश्याबुक्याने मारहाण केली. पोलीस ठाण्यात बलात्कार केस न दाखल करण्याच्या मोबदल्यात त्यांना ब्लॅकमेलिंग करुन २ करोड रुपये खंडणी मागुन वेळोवेळी त्यांच्याकडून १९ लाख ७० हजार रुपये खंडणी स्विकारली.
आरोपी नफीजने त्यांना गुंदवलीत असलेली स्थावर मालमत्ता स्वस्त दरात मिळवुन देतो असे सांगत त्यांच्याकडून २४ लाख रुपये स्विकारुन अपहार केला. तसेच त्यांची वसईत असलेली बिल्डींग ही रेल्वे कॉरीडॉरमध्ये कटींग होणार असल्याचा खोटा नकाशा दाखवुन भरपाईपोटी संबंधीत प्राधिकरणाकडुन २५ करोड रक्कम वसुल करुन देतो असे खोटे आश्वासन दिले. त्याकरीता रेल्वेच्या व इतर विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच दयावी लागेल असे सांगुन १७ लाख ८० हजार रुपये रोखीने व बँक खात्यावर घेऊन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीची माहीती काढली. आरोपी नफीज शेखला ताब्यात घेवुन तपास केला. गुन्हयातील दोन आरोपी हे राजस्थान व गुजरात राज्यात वास्तव्यास असल्याची माहीती मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळे पथके तयार करुन त्या राज्यात पाठवले. राजस्थानमधून आरोपी साहिबा राजवीरसिंग बक्षी उर्फ नीतु जयप्रकाश पांडे (२९) आणि गुजरातमधून आरोपी मनिषभाई मनुभाई सेठ (४८) यांना अटक केली. आरोपीकडून ब्लॅकमेल करुन मिळालेले ७ लाख ८८ हजारांची रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरलेली टोयोटा फॉरच्युनर व मारुती सुझुकी बलेनो कार असा एकूण २२ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.