ठाणे : पवईतील हिरानंदानी इस्टेट येथील रहिवासी संजीव देशपांडे (६२) हे ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी रविवारी सकाळी गेले होते. मात्र, ते अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांसहठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोधमोहिम राबविली. तीन ते चार तासांच्या शोधमाहिमेनंतर ते टायगर पॉईंटजवळ बेशुद्ध आढळले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हिरानंदानी इस्टेट येथील ऑक्टवाइस इमारतीमध्ये राहणारे देशपांडे हे २७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेले होते. ते नेहमीप्रमाणो घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. नेहमी या मार्गावरून जाणाऱ्या स्थानिक ट्रेकरचीही मदत पोलिसांनी घेतली. दरम्यान, ठाण्यातील चितळसर पोलिसांनीही ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि वन विभागाच्या मदतीने दुपारी १२ पासून शोधकार्य राबविले. ते टायगर पॉईंटजवळ बेशुद्ध असल्याची माहिती दुपारी २.४० वाजता मिळाली. तेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासह वन विभागाने स्ट्रेचरच्या मदतीने डोंगरावरून त्यांना तासाभरानंतर खाली आणले. त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.