मुंबई : मुंबईत गांजाचा पुरवठा करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकून त्याच्याकडून ४१ किलो गांजा जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यापाठोपाठ एमडी तस्करी करणाऱ्या चौकडीला बेड्या ठोकून त्यांच्याकडून २५ लाखांचा एमडी जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पेण, रत्नागिरीमधील तस्करांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे आणि घाटकोपर पथकाने ही कामगिरी केली आहे.
एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वांद्रे पथक अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनी सेक्टर ३ अँटॉप हिल भागात गस्त करत सलमान झाकीर हुसेन शेखच्या संशयास्पद हालचाली पथकाने हेरल्या. त्याच्याकडे असलेल्या गोणीतून २० किलो गांजा जप्त केला. तसेच त्याच्या राहत्या घरातून २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १० लाख २५ हजार किंमतीचा ४१ किलो गांजा जप्त करण्यास पथकाला यश आले आहे. सलमान विरोधात डायघर, जे.जे मार्ग, वडाळा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंद असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
त्यापाठोपाठ दुसऱ्या कारवाईत शिवाजी नगर परिसरात एमडी विक्री कारण्यासाठी आलेल्या दुकलीला बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरीच्या आसिफ आदाम वाडकर (३३) आणि पेण मधील हरेश्वर ज्ञानेशवर पाटील उर्फ मुन्ना अशी अटक तस्करांची नावे आहेत. दोघांकडून १७० ग्रॅम एमडी जप्त करण्यातaआला आहे. त्यांच्या चौकशीत हा एमडी पेण मधील प्रशांत बाळाराम ठाकूर(४१) आणि दर्शन पांडुरंग पाटील (३१) यांच्याकडून घेतल्याची माहिती समोर येताच पथकाने त्यांनाही पेण मधून अटक केली आहे. ही चौकडी एकत्रित पैशांचा व्यवहार करत एमडी तस्करी करत होते. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.