पूनम अपराज
नवी मुंबई - पुणे स्वारगेट येथून खासगी प्रवासी कारने खारघरला येणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार, अँकरला कारमधील चार लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेषत: या लुटारुंनी या पत्रकाराच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला कळंबोलीतील रोडपाली भागात सोडून चौघे फरार झाले आहेत. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
गिरीश निकम (वय - 41) असे या पत्रकाराचे नाव असून तो खारघर सेक्टर-12 मध्ये रहाण्यास आहे. गिरीश एका मराठी वृत्तवाहिनीमध्ये अँकर म्हणून काम करत असून गेल्या सोमवारी गिरीश वैद्यकीय उपचारासाठी पुणे येथे गेला होता. त्यानंतर सायंकाळी तोे पुन्हा खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेला होता. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खासगी प्रवासी कार असून त्यात फक्त एकाच प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीशने देखील घरी पोहोचण्यास उशीर होऊ नये, यासाठी या खासगी प्रवासी कारने 2500 रुपयांमध्ये खारघर येथे येण्यास तयारी दाखविली.
गिरीश पांढऱ्या रंगाच्या एकसेन्ट कारमध्ये जाऊन बसला, त्या कारमध्ये चालकासह चार जण बसले होते. त्यानंतर ती कार मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. त्यानंतर पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर कार चालकाने लंघुशंकेच्या निमित्ताने कार थांबवली.
यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजूला बसल्यानंतर त्याने गिरीशच्या कमरेला बंदूक लावून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्याजवळ जे काही आहे, ते काढून देण्यास बळजबरी केली. अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाइल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर लुटारुंनी गिरीशजवळ असलेले एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेऊन त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला ठार मारण्याची धमकी देऊन एटीएम कार्डचा पासवर्ड विचारुन घेतला. त्यानंतर लुटारु चौघांनी काही किलोमीटर अंतरावर कार थांबवून गिरीशच्या एटीएम कार्डचा वापर करुन त्याच्या खात्यातील 41 हजाराची रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर या लुटारुंनी गिरीशला त्याचा मोबाइल फोन आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले.
त्यानंतर गिरीशने डोळ्यावरची पट्टी काढून मोबाइल फोनवरुन आपल्या मित्रांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुटारुंनी त्याच्या मोबाइलमधील दोन्ही सिम कार्ड काढून घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने एका रिक्षा चालकाची मदत घेऊन कळंबोली पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर जबरी चोरीचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मछिंद्र खाडे यांनी याप्रकरणी गुन्हा पुण्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग केल्याचे सांगितले आहे.