लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) आझाद मैदान आणि कांदिवली कक्षाने चार तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७० लाखांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करांविरोधात अंमली पदार्थविरोधी विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदान एएनसी टीमने कुरेशी नगर, कुर्ला आणि नूरबाग जंक्शन डोंगरी परिसरात रात्री ऑपरेशन करून ५२ लाख एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक केली. अटक आरोपीपैकी इम्रान फारुख शेख विरोधात ड्रग्जच्या ४ गुन्ह्यासह पाच गुन्हे नोंद आहे. दुसरा आरोपी रियाझ इलियास जुमानी विरुद्ध ३ चोरीच्या घटनांचा समावेश आहे.
कांदिवलीच्या टीमने वांद्रे परिसरातून १७ लाखांच्या एमडीसह दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली. यावर्षी एकूण १८० ड्रग्ज तस्करांना अटक करण्यास यश आले आहे. मोईन हनीफ भुजवला (३५) आणि बाजिद अशरफ खान (२१) अशी कांदिवली कक्षाने कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना कोर्टात सादर करण्यात येणार आहे.
४० कोटींचे ड्रग्ज जप्त आणि ९० गुन्हे
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनखाली २०२३ मध्ये एकूण ९० गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण १८० अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून, त्यांचे ताब्यातून एकूण ४० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची तस्करी करणायां विरुध्द ६० गुन्हे दाखल करत एकूण १२१ आरोपींविरूध्द कारवाई केली असून, त्यांचे ताब्यातून अंदाजे २८ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.