...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 08:07 PM2019-08-20T20:07:42+5:302019-08-20T20:09:42+5:30
बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना मुख्य सूत्रधार मानले आहे. आज दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी दाखल झालं होतं. मात्र, चिदंबरम नसल्याकारणाने सीबीआयचे पथक रिकाम्या हाती परतले.
दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायधीश यांनी वरिष्ठ न्यायाधीशांसमोर याप्रकरणी बुधवारी याचिका सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजेच बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल. दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना मुख्य सूत्रधार म्हणत हे मनी लाँड्रिंगचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं.
आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७ मधील असून त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. सीबीआयने १५ मे २०१७ साली आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांना देखील अटक केली होती. सध्या कार्ती चिदंबरम जामिनावर आहेत. मात्र, आज दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे.