- नरेश डोंगरे
नागपूर : पाऊस कोणत्याही क्षणी येण्याची चुगली करणारे काळेकुट्ट ढग आकाशात वारंवार गडगडाट करीत होते. किर्र अंधारात रातकिड्यांचे कर्कश रडगाणे सुरू होते. अचानक अजब बंगल्याजवळच्या मोकाट कुत्र्यांनी ओरडणे सुरू करून वातावरण अधिकच भयावह करून सोडले. अशात एका घराभोवती काही जण गराडा घालत होते. अचानक शिवीगाळ, आरडाओरड सुरू झाली अन् अंधारात चाकूचा घाव बसल्याने पोलीस अधिकारी काहीसे किंचाळले. मात्र त्याही अवस्थेतही विजय माहुलकर नामक अधिकाऱ्याने अंधारात चाकू मारणाराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.
आजुबाजुला आपले पोलीस सहकारी आहेत, याचे भान असल्याने मुद्दामहूनच माहुलकरांनी त्यावेळी खालच्या बाजूने, आरोपीच्या पायाला लागेल, असे ठरवून गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबाराचा आवाज, आरडाओरड, गलका ऐकून पहाटेची भीषण शांतता भंगली अन् अजनी परिसरात एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. गर्दीचा फायदा उठवत खतरनाक गुन्हेगार पळून गेला. नंतर जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीला लगेच पोलिसांचा ताफा धावून आला. तोपर्यंत दिवस उजाडला होता अन् नागपुरात आरोपीचे एन्काऊंटर होता होता, राहून गेल्याचे वृत्त महाराष्ट्रात चर्चेला आले होते.
आरोपी होता, कुख्यात बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूर. १८ डिसेंबर २००५ ला कळमेश्वर जवळच्या लोणारा गावात राहणाऱ्या कांचन मेश्राम नामक युवतीवर आरोपी राकेश कांबळे आणि अमरसिंग ठाकूर या दोघांनी सुमारे ५०० लोकांसमोर बलात्कार करून तिची सर्वांसमोर क्रूरपणे हत्या केली होती. तेथून पळाल्यानंतर काही तासानंतर त्यांनी बेसा परिसरात एका शिक्षिकेची हत्या केली. आरोपी फरार असल्याने नागरिकांचा रोष प्रचंड वाढला होता. दरम्यान, आरोपी अजनी परिसरात लपून असल्याचे कळाल्यानंतर नागपूर एलसीबीचे तत्कालीन पोलीस अधिकारी विनोद पटोले यांनी तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक आणि सध्याचे पोलीस उपअधीक्षक विजय माहुलकर यांना हे ऑपरेशन सोपविले.
त्यानुसार, माहुलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आरोपींना पहाटेच्या सुमारास संशयीताच्या घराला गराडा घातला. ते लक्षात येताच अंधाराचा लाभ ऊठवत आरोपी ठाकूर याने बाहेर पडून माहुलकर तसेच अन्य एका पोलिसावर चाकू हल्ला केला. जखमी अवस्थेतील माहुलकर त्याचे एन्काऊंटर करण्यासाठी दोन फायर केले. मात्र आरडाओरडीमुळे मोठ्या प्र्रमाणात लोक घराबाहेर आल्याने संधी साधत आरोपी ठाकूर तेथून पळून गेला. नंतर हुकलेल्या या एन्काऊंटरने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उढवून दिली होती.
कन्हानमध्ये कोलमाफियाचे एन्काऊंटरअडीच दशकांपूर्वी जिल्ह्यातील कन्हान मध्ये एका कोलमाफियाचे नागपूर ग्रामीण पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. त्यावेळी केवळ मुंबईतच अंडरवर्ल्डशी संबंधित टोळ्यातील गुंडांचे एन्काऊंटर होत असल्याने कन्हानच्या एन्काऊंटरने नागपूर पोलिसांना मानाचे पदक मिळवून दिले होते. बदलापूर आरोपीच्या एन्काऊंटरमुळे ही प्रकरणेही आता चर्चेत आली आहे.