पुणे : विमा पॉलिसीचा लाभ मिळवून देण्याचा बहाणा करून दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून पकडलेसुमित वत्स टेकचंद शर्मा (वय ३१), अंकुरसिंग पालेराम खुशवाह (वय ३२, दोघे रा़ मेरठ रोड, गाझियाबाद), दुर्गेश सुभाषचंद्र शर्मा (वय ४२, रा़ गाझियाबाद उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिवाजीनगर येथील रहिवासी विजय केशव कानिटकर यांना बद्रीप्रसाद कोठारी, घोष प्रीतम, सीताराम केसरी, चतुर्वेदी, अजय शर्मा अशा वेगवेगळ्या नावांनी काही जणांनी फोन केले़ त्यांना आपण आयआरडीए चेन्नईमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना इन्शुरन्स कंपनीबाबत माहिती दिली. त्यानंतर जुन्या पॉलिसी बंद झाल्या आहेत. त्या पॉलिसीचे व्याज, लाभ आणि बोनसचे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी काही नवीन विमा पॉलिसी घ्याव्या लागतील व काही रक्कम फंड रिलीज करण्यासाठी टॅक्स भरावे लागेल, असे सांगितले. हे पैसे भरल्याशिवाय लाभ मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यानंतर कानिटकर यांनी मार्च ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये १ कोटी ५१ लाख ९२ हजार ४०० रुपये भरले़ तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ, व्याज व बोनस मिळाला नाही़ त्यामुळे त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला़ तेव्हा त्यांना फसविणारे गाझियाबाद येथे राहणारे असल्याची माहिती समोर आली़ त्यानंतर एका पथकाने गाझियाबाद येथे जाऊन तिघांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले़ अधिक तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, नितीन चांदणे, अमित औचरे, बाळासाहेब कराळे यांच्या पथकाने केली.
विमा पॉलिसीचा लाभ देण्याच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक, गाझियाबादहून तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:38 AM