चामोर्शी (गडचिरोली) : शिक्षण घेण्याच्या अपरिपक्व वयात प्रेमाच्या सप्तरंगी स्वप्नांच्या दुनियेत उडणे किती धोकादायक असते याचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील मुरखळा (माल) येथे घडली. अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकाशी प्रेम जुळले. पण वडीलांनी त्यावरून तिला रागावल्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला की तिने थेट गळफास घेऊन जीवन संपविले. त्या युवतीचे ते कृत्य कळल्यानंतर संबंधित युवकानेही आपल्या घरी गळफास लावत आपल्या प्रेमाची परीक्षा दिली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरखळा (माल) या लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे प्रेम गावातील गुराखी म्हणून काम करणाऱ्यांचा मुलगा वृषभ (२१ वर्ष) याच्याशी जुळले. वृषभ महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. २२ मार्च रोजी मुलगी घरीच फोनवर त्या युवकाशी बोलत असताना वडिलांनी ऐकले. त्यावरून त्यांनी तिची खरडपट्टी काढली. ‘असे सारखे फोनवर बोलत राहणे तुझे काम नाही, आधी व्यवस्थित शिक्षण घेणे,’ असा सबुरीचा सल्लाही तिला दिला. पण याचा तिच्या मनावर चांगलाच परिणाम झाला आणि तिने कोणताही विचार न करता आपल्या काकाच्या घरी जाऊन गळफास लावून घेतला.
अन् वृषभही चढला फासावरमुलीने गळफास लावल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली. कुटुंबीयांनी तिला लगेच चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे वृत्त वृषभच्याही कानावर गेले. आपल्यासाठी तिने आत्महत्या केली, आता आपण जगून काय उपयोग, असा विचार करून त्यानेही आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दोन्ही घटनांची नोंद चामोर्शी पोलिसांनी घेतली असून तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जोगेश्वर वाकुडकर व विरकान साखरे करीत आहे.