मुंबई - अंधेरी येथील कामगार रुग्णालय आग प्रकरणी इमारत बांधणाऱ्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर जवळपास १४० जण जखमी झाले होते. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कामगार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. कामगार रुग्णालयाची इमारत बांधत असलेल्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनचा मुख्य अभियंता निलेश मेहता आणि त्याचा सहाय्यक नितीन कांबळेला पोलिसांनी अटक केली असून अद्याप रुग्णालयाचे काही बांधकाम देखील शिल्लक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी लोकमतशी बोलताना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४ - अ अन्वये गुन्हा या दोघांविरोधात दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.