चित्तूर: आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणानं बकऱ्याऐवजी त्याला पकडलेल्या व्यक्तीची मान कापली. त्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चित्तूरमधल्या वलसापल्लेमध्ये संक्रांतीनिमित्त यल्लमा मंदिरात बळी दिला जातो. आरोपी चलापथी जनावरांचा बळी देत होता. त्यावेळी ३५ वर्षांचा सुरेश बकऱ्याला धरून उभा होता. चलापथीनं बकऱ्याऐवजी सुरेशची मान कापली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चलापथी नशेच्या अमलाखाली होता. त्यानं बकऱ्याच्या जागी सुरेशच्या मानेवर वार केला.
गंभीर जखमी झालेल्या सुरेशला मदनपल्ले येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चलापथीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. सुरेश विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. चलापथी आणि सुरेशचा काही जुना वाद होता का याचा तपास पोलीस करत आहेत.
यल्लमा देवीच्या प्राचीन मंदिरात मकर संक्रांतीला बळी दिला जातो. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही परंपरा अतिशय जुनी आहे. संक्रांतीला लोक जनावरं घेऊन मंदिर परिसरात येतात आणि त्यांचा बळी देतात. सुरेशदेखील मंदिर परिसरात जनावराचा बळी देण्यासाठी आला होता.