नवी दिल्ली - आंध्र प्रदेशातील अमलापूरम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून लोक संतप्त झाले आहेत. काही लोकांनी जिल्ह्याचं नाव बदलू नये या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. तसेच शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून याविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले. संतप्त आंदोलकांनी मंत्र्यांचं घर पेटवून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
गावात तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं. पोलिसांच्या गाडीला आग लावण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने राज्याचे वाहतूक मंत्री पी विश्वरुप यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून दिलं. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली आहे.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 20 हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अमलापूरममध्ये जमावबंदी लावण्यात आली आहे. याशिवाय आसपासच्या जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेवर नाराजी जाहीर केली आहे. मंत्र्यांच्या गाड्यांना देखील आग लावण्यात आली आहे.
"आंबेडकरांच्या नावाचा समावेश होत असल्याने अभिमान वाटण्याऐवजी काही समाजविरोधी घटक हिंसाचार घडवत असून वाहनांना आग लावत आहेत. 20 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत हे फार दुर्दैवी आहे. आम्ही पूर्ण चौकशी करू आणि दोषी आढळणाऱ्यांना कडक शिक्षा देऊ" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.