लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कौटुंबिक विवंचनेतून भूलतज्ज्ञाने स्वतःसह पत्नी आणि मुलीला भुलीचे इंजेक्शन देत आत्महत्या केल्याची घटना विलेपार्ले येथे घडली. यात त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला असून, पत्नी वाचली आहे. घटनास्थळी त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून, त्यानुसार विलेपार्ले पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील इमारतीत हे ६८ वर्षांचे डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक अनुभवी भूलतज्ज्ञ होते, तर मुलगी प्राध्यापिका होती. कोरोनामुळे गेले दीड वर्ष ते घराबाहेर पडले नव्हते. त्यातच फारशा शस्त्रक्रिया होत नसल्याने त्यांना रुग्णालयातूनही कामासाठी बाेलावण्यात येत नव्हते. मुलीच्या विवाहासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण विवाह जुळत नव्हता. एकंदर या सगळ्या प्रकारांमुळे ते तणावाखाली होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
या डॉक्टरच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या भूलतज्ज्ञाने दोन दिवसांपूर्वी उशिरा रात्री त्यांनी आपली रक्त तपासणी करू, असे सांगितले होते. त्याचदरम्यान मुलीला आणि पत्नीला त्यांनी भुलीचे इंजेक्शन टोचले असावे. त्यानंतर स्वतःही त्यांनी भुलीचे इंजेक्शन टोचून घेतले असावे. पत्नी सकाळी उठली तेव्हा पती आणि मुलगी दोघेही बेडवर निपचित पडले होते, तसेच त्यांचे शरीरही थंड पडले होते. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. डॉक्टरने पत्नीला दिलेल्या इंजेक्शनमध्ये भुलीच्या औषधाचे प्रणाम कमी झाल्याने पत्नी वाचल्याचा पोलिसांचा कयास आहे.
धार्मिक विधी करू नका!भूलतज्ज्ञाने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यात आमच्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसून, आमच्या मृत्यूपश्चात कोणताही धार्मिक विधी करू नये, असे नमूद केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.