मुंबई : नशा करण्यासाठी ५०० रुपये बळजबरीने घेतल्याच्या रागात विक्रम निशाद नामक इसमाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तपास करत अवघ्या ८ तासात मारेकऱ्यांना शुक्रवारी गजाआड केले. याप्रकरणी शिन्या महादेव मंदिर परिसरातून आरोपी नाव संदीप रॉय (२५) आणि घनश्याम दास (५०) यांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
वर्सोवा गाव परिसरात १६ एप्रिल, २०२१ रोजी निशादचा मृतदेह सापडला होता. खुन दुर्गम खाडीलगत झाल्याने तसेच घटनास्थळी कोणताही दुवा पुरावा उपलब्ध नसल्याने मयताची ओळख पटवणे व आरोपीचा शोध घेणे जिकरीचे होते. निशादच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने निर्घृणपणे वार केले होते. त्यानुसार वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केदारी पवार संग्रामसिंग पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. मयताचे फोटो व शरीरावरील गोंदण यावरून मयत इसम निशादची ओळख पटली. मात्र, या गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती अथवा पुरावा नसल्याने वर्सोवा पोलिसांनी कौशल्याने आरोपीबाबत माहिती गोळा करून शिन्या महादेव मंदिर परिसरातून आरोपी नाव संदीप रॉय (२५) आणि घनश्याम दास (५०) याना ताब्यात घेतले. निशादने नशा करण्यासाठी घनश्यामकडून जबरदस्ती ५०० रुपये घेतले होते. त्याचा राग मनात धरून चाकूने भोसकून त्याचा खून केल्याचे आरोपींनी सांगितले.