संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात फावडा मारुन केली हत्या; कारण ऐकून पोलीस झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:00 PM2021-11-08T14:00:23+5:302021-11-08T14:08:17+5:30
रागाच्या भरात त्याने घरातील फावड्याने पुष्पाच्या डोक्यात वार केला.
बालाघाट – मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एक अजबगजब घटना समोर आली आहे. याठिकाणी एका पतीने रागाच्या भरात पत्नीचा जीव घेतला आहे. क्षुल्लक कारणावरुन पती पत्नीवर भडकला आणि त्याने तिला संपवलं. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ५० वर्षीय आरोपी पती हा वनविभागात नोकरीला होता. तर पत्नी गृहिणी होती.
किरनापूर पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, शनिवारी ही दुर्घटना घडली. पती राजकुमार बहे हा वनविभागात कामाला होता. त्याने पत्नी पुष्पा बाई हिची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. केवळ पत्नीनं पतीचं ऐकलं नाही म्हणून तिला संपवलं. राजकुमार आंघोळीला गेला होता. तेव्हा त्याने टॉवेल मागितला. तो लगेच पत्नीने आणून दिला नाही. त्यामुळे पती राजकुमारचा राग अनावर झाला.
माहितीनुसार, जेव्हा राजकुमारने टॉवेल मागितला तेव्हा पत्नी किचनमध्ये भांडी धुत होती. तिने राजकुमारला थोडं थांबा इतकं म्हणाली. परंतु राजकुमारला पत्नीने दिलेलं उत्तर आवडलं नाही. त्याला राग आला आणि त्याच रागाच्या भरात त्याने घरातील फावड्याने पुष्पाच्या डोक्यात वार केला. या घटनेत पुष्पाचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी घरात हजर असलेली २३ वर्षीय मुलीने पित्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी राजकुमारनं तिलाही मारहाण केली.
शनिवारी मृत पुष्पा बाई यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राजकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. परंतु इतक्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केली त्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वीच महिला सरपंचाची हत्या
अलीकडेच मध्य प्रदेशातील दमोह येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत एका महिला संरपंचाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ६ जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. ही घटना बटियागडच्या बरखेडा गावातील आहे. येथे दोन गटात जोरदार मारामारी झाली. त्यावेळी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या वापरण्यात आल्या. या गोंधळात ६ पेक्षा अधिकजण जखमी झाले. जखमींमध्ये गावातील महिला सरपंच गेंदाबाई यांची सूनही होती.
सरपंच गेंदाबाई यांच्या डोक्यावर लाठ्या काठ्या मारण्यात आल्या होत्या. गंभीर रित्या जखमी झालेल्या गेंदाबाईला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु त्याठिकाणी तिचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरुन ही मारामारी झाल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंद केला असून अद्याप आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.