सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या व आंबोली येथे जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सोमवारी सुरु झाली. यात मयत अनिकेत कोथळे चा मित्र आणि या खटल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची न्यायालयात साक्ष घेण्यात आली. या खटल्याची सुनावणी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत आहेत.
शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खून केल्याची घटना दि.६ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरिक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयितांच्या विरोधात खटला सुरु आहे. लुटमारीच्या संशयावरुन अटक केलेल्या अनिकेत कोथळे यास मारहाण केल्यावर पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयीतांनी अनिकेतचा मृतदेह सुरुवातीला पोलीस गाडीतून आणि नंतर खासगी वाहनाने आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता. कोरोनामुळे सुनावणी थांबली होती. ती आजपासून पुन्हा सुरू झाली आहे.