मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला २७ मार्च, तर त्याची मुलगी व फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला २४ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी अनिल जयसिंघानीला सोमवारी गुजरातमधून अटक केली होती. त्याला व त्याची मुलगी अनिक्षाला मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. अनिक्षा उत्तरे देण्यास टाळत आहे. योग्य माहिती देत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने आता काय शिल्लक आहे, अशी विचारणा देसाई यांना केली.
फडणवीसांना अडकविण्याचा प्रयत्नबुकी अनिल जयसिंघानी याचा ताबा मागताना देसाई यांनी म्हटले की, सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीद्वारे अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अमृता यांच्याकडून १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी ३ वेगवेगळे फोन वापरण्यात आले.
नातेवाइकांच्या नावावर करायचा रूम बुक...अनिल जयसिंघानी पाठोपाठ त्याला लपविण्यात मदत करणारा नातेवाईक, जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले, त्यावेळी तो त्याच्यासोबत होता. चौकशीअंती त्याचा सहभाग उघड होताच त्याच्यावर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली. निर्मलने अनिलला लपण्यात मदत केली आणि त्याला लॉजिस्टिक सपोर्टही केला. निर्मलच्या नावाने तो हॉटेलमध्ये रूम बुक करायचा. निर्मलने अनिल जयसिंघानीला कशी मदत केली? याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
सरकारी वकील काय म्हणाले?अनिल आणि अनिक्षा या दोघांना समोरासमोर बसवून माहिती योग्य आहे की नाही, हे तपासायचे आहे. एक मोबाईल नंबर आहे. तो कोणाचा आहे, हे आम्हाला माहिती आहे. फक्त त्याबाबत खात्री करून घ्यायची आहे. तपासात प्रगती आहे. मात्र, दोघांकडून आणखी माहिती घ्यायची आहे, असे देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.
१९८४ पासून आरोपीला पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा सरकारची मेहरनजर होती. जेव्हा लोक आरोपीविरोधात गेली तेव्हा तो खलनायक ठरला. आरोपीला बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. आरोपीचा चुलत भाऊ त्याच्याबरोबर होता म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद जयसिंघानी यांचे वकील वीरेंद्र खन्ना यांनी न्यायालयात केला.