जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याने ऐन दिवाळीत राज्यातील राजकारणात मोठा बॉम्ब फुटला. त्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १३ तास त्यांची चौकशी केली असली तरी त्यातील अखेरचे चार तास निर्णायक ठरल्याचे सांगण्यात येते. रात्री साडेआठच्या सुमारास सहआयुक्त सत्यव्रत कुमार दिल्लीतून मुंबईच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी चौकशीची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. देशमुख यांच्याकडून त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने चौकशी उशिरापर्यंत चालू ठेवत अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने त्याच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगच्या १९ पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर चार महिन्यांपासून बेपत्ता असलेले देशमुख सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात वकिलासमवेत हजर झाले. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत तातडीने दिल्लीतील मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची कल्पना दिली.
मुंबई विभागाचे सहआयुक्त सत्यव्रत कुमार हे पणजी व रायपूर विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यासंबंधीच्या कामासंबंधी दिल्लीत होते. त्यामुळे मुंबई युनिट-२चे अप्पर आयुक्त योगेश वर्मा यांना देशमुख यांच्या चौकशीची कार्यवाही सुरू करण्याच्या तर सत्यव्रत कुमार यांना तातडीने मुंबईत जाण्याची सूचना मुख्यालयातील विशेष संचालक अनुपकुमार दुबे यांनी दिल्या. त्यानुसार कुमार हे विशेष विमानाने मुंबईला आले. रात्री साडेआठच्या सुमारास कार्यालयात पोहचल्यानंतर त्यांनी गेल्या ९ तासांपासून झालेल्या कार्यवाहीची अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. त्यानंतर स्वतः चौकशीला प्रारंभ केला. अटक केलेल्या पी. ए. कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्याकडून मिळालेली माहिती, सचिन वाझे व अन्य साक्षीदाराच्या जबाबाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे माहिती विचारली.
देशमुख हे बहुतांश प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांनी सर्व सहकाऱ्यांना उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्याची सूचना केली. कंटाळलेल्या देशमुख यांना साडेबाराच्या सुमारास संशयित म्हणून अटक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याचे वकील इंद्रपाल सिंह कार्यालयात आले. देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सुमारे तीनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. देशमुख यांच्यावर सेक्शन १९ पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख यांना मिळणार घरचे जेवण‘ईडी’च्या ताब्यात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार असली तरी, त्यांना तेथे घरचे जेवण, औषधे मिळणार आहेत. तसेच चौकशीवेळी त्यांच्या वकिलालाही त्यांच्यासमवेत उपस्थित राहता येणार आहे. देशमुख यांचे वय व आजारपण लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना ही मुभा दिली असल्याचे त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात आले.