महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १०० कोटी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. या तपासासाठी ईडीच्या मुंबई शाखेने काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली असून त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. यासाठी ईडीने प्रश्नांची यादी तयार केली आहे.ईडी सूत्रांनी असेही म्हटले आहे की, याचिकाकर्त्या वकील जयश्री पाटील आणि बार मालकांशी संबंधित पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या सचिन वाझे यांना संबंधित प्रश्न विचारले जातील. कारण असा आरोप आहे की, अंधेरी वेस्टसह अनेक भागात सचिन वाझेला रेस्टॉरंट्स आणि बारच्या मालकांकडून पैसे दिले जात होते. ईडी टीमने या प्रकरणी चौकशीसाठी ५ बारमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. जे सचिन वाझेला हफ्ता पैसे देत असे.
ईडीने आज सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. त्यापैकी शिवाजीनगर भागातील भटेवार हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी असल्याची माहिती आहे. ईडीच्या दुसऱ्या पथकाने सदर येथील न्यू कॉलनी येथील एका इमारतीवर धाड टाकली. आयझेक कुटुंबीयांचा हा बंगला असून समित आयझेक हेसुद्धा अनिल देशमुख यांचे जवळचे समजले जातात. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी येथील आयझॅक कुटुंबीयांच्या बंगल्यात दाखल झाले. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. याशिवाय नागपुरातील जाफरनगर भागातील एका ठिकाणी ईडीच्या अधिकाºयांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.