मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिगच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांची बुधवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. बदलीच्या अनुषंगाने देशमुख यांनी त्यावेळी दिलेल्या सूचनाबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्याकडे सादर केल्याचे समजते.
गेल्या बुधवारी त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने त्यासंबंधी कागदपत्रे जमा करून घेतली. सुमारे ५ तास ते ईडीच्या कार्यालयात होते. माजी गृहमंत्री देशमुख यांना अनेकदा समन्स बजावुनही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. सध्या ते बेपत्ता आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आयपीएस अधिकारीच्या बदलीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या अनुषंगाने पुरावे गोळा करीत आहे. त्यानुषंगाने गृह विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधी कक्ष (पोल)-१ कामकाज पाहणाऱ्या गायकवाड यांना चौकशी केली जात आहे. २०२०मध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत राबविण्यात आलेली प्रक्रिया व त्यासाठी मंत्री व अन्य वरिष्ठकडून कोणत्या सूचना करण्यात आल्या, बदल कोणाच्या सूचनेनुसार करण्यात आले. याबद्दल सविस्तर विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.